• फोन: ०२३६२ २२२५०८

पिंगुळी स्थानाची माहिती आणि येथे आल्यावर काय पहाल

१९०५ साली पिंगुळी या कुडाळ तालुक्यातील एका छोट्याश्या खेडेगावात श्रीदेव रवळनाथाचे मानकरी असलेल्या राऊळ घराण्यामध्ये परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज जन्माला आले. श्री. आप्पाजी गोपाळराव राऊळ व सौ. सावित्री आप्पाजी राऊळ या सत्शील दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या बालकाचे पाळण्यातील नाव "कृष्ण" आणि कृष्णलीला दाखवत "आबा" म्हणून एक अवलिया संत परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज म्हणून नावारूपाला आले. त्यांनी ज्या पिंगुळी क्षेत्राला तपोभूमी मानली, तेथेच त्यांचे समाधीमंदिर परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी उभारले.

संजीवन समाधी

परमपूज्य श्रीसमर्थ राऊळबाबांच्या सजीव मूर्तीचा फोटो

विहीर

परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजसमाधीमंदिरासमोर एक विहीर आहे. श्रद्धाळू भक्त या विहीरीचे पाणी ‘तीर्थ’ म्हणून प्राशन करतात.

'गाणगापूरचा दत्त'

परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधी मंदिराच्या डाव्याबाजूला औदुंबर वॄक्ष आहे. परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज या औदुंबराला ‘गाणगापूरचा दत्त’ म्हणत. परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराज आजही या औदुंबराला भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी अकरा प्रदक्षिणा घालायला लावतात. प्रत्येकाला दत्तस्थानाला भेट दिल्याचे समाधान लाभते.

श्रीगौरी-शंकर मंदिर

परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधीमंदिरासमोर श्रीगौरी-शंकर मंदिर जेथे शिवशक्ति लाभलेले परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराज, तेथे असलेल्या शिवपिंडीची उपासना नियमित करतात.

श्रीविठ्ठलरखुमाई मंदिर

श्रीगौरी-शंकर मंदिरालगतच श्रीविठ्ठलरखुमाई मंदिर आहे. तेथे गेल्यानंतर पंढरपूरची वारी केल्याची भावना मनात जागते.

श्रीहनुमान मंदिर

श्रीविठ्ठलरखुमाई मंदिराच्या बाजूलाच श्रीहनुमान मंदिर आहे. या मागची संकल्पना अशी की परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांना ज्ञानेश्वरी खुप आवडायची. त्यामुळे परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराज ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सप्ताह मंदिरात करत असत. प्रत्येक पारायणानंतर वारकरी दिंडी काढत आणि ती दिंडी शास्त्रानुसार हनुमंताला भेटायला नेली जाते. परंतु पिंगुळी क्षेत्रात हनुमान मंदिर नसल्याने हे वारकरी परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या घरी जात. असे वारंवार घडल्यानंतर परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी श्रीहनुमान मंदिर उभारण्याचा संकल्प केला. आपल्या ५० व्या वाढदिवशी १३ मार्च १९९५ साली श्रीहनुमानमूर्तीची प्रतिष्ठापना करून हा संकल्प पूर्तीस आणला.

रंगमंच

श्रीविठ्ठलरखुमाई मंदिर आणि श्रीहनुमान मंदिराच्या मध्ये सामुहीक कार्यक्रमासाठी एक रंगमंच आहे.

श्रीगुरूकाकामहाराजांचे समाधीमंदिर

श्रीहनुमान मंदिराच्या बाजूला परमपूज्य श्रीगुरूकाकामहाराजांचे समाधीमंदिर आहे.परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांचे हे लहान भाऊ.

दीपमाळ

गाणगापूरचा दत्त मानत असलेल्या त्या औदुंबर वॄक्षाच्या बाजूला एक दीपमाळा आहे. १९८७ साली परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांची अर्चा व खुप मोठा यज्ञ या दीपमाळेच्याच जागी करण्यात आला. त्या जागेचे पावित्र जपलं जावे म्हणून १९८८ साली ही दीपमाळा परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी बांधून घेतली.

सभामंडप

दीपमाळेच्या बाजूला नवीन सभामंडप आणि त्यावर भक्तनिवास उभारण्यात आले आहे. हा सभामंडप ९५ फूट लांब आणि ४५ फूट रूंद असून बाजूने वयोवॄद्धांना बसण्याची सोय केलेली आहे. या सभामंडपाच्या मागे प्रशस्त स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे. या सभामंडपात एकावेळी १००० भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतात.

श्रीमाऊली मंदिर

कोकणातील चेंदवण गावाचं ग्रामदैवत आणि परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांचे श्रद्धास्थान असलेली श्रीमाऊलीदेवी. या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर २०० वर्षांपूर्वीची हि तीन तुकडे झालेल्या पाषाणाची संस्कारित मूर्ती परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांनी, परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांच्या स्वाधीन केली. ती देवीची मूर्ती परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी विसर्जित न करता एकसंध करून घेतली आणि पुनःप्रस्थापित केली. आजही हि श्रीमाउलीदेवी नवसाला पावते.

श्रीदत्तमंदिर

परमपूज्य श्री समर्थ राऊळबाबांच्या समाधीमंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविकांचा ओढा वाढू लागला. परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी श्रीदत्तमंदिर उभारायचे ठरले. ते स्वत: बांधकाम करताना वावरत असत दत्तमंदिराचा गाभारा परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी स्वत: चिखल तुडवत तयार केला. गाभाऱ्याचे काम चालू असताना परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराज चिखलात माखलेले असताना मराठी अभिनेत्री सौ.अलका कुबल दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांना त्या चिखलात मनोभावे नमस्कार केला. परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी दत्ताच्या मूर्तीसाठी त्या सौ. अलका कुबल यांना विचारणा केली. त्यांनी कसलाही संकोच न करता श्रीदत्ताच्या मूर्तीसाठी होकार दिला आणि दि.८ डिसेंबर २००३ या दिनी श्रीगणपती, श्रीदत्त व श्रीशिवशंकर या तिन्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावरच भक्तांची राहाण्याच्या सोयीसाठी भक्तनिवास उभारण्यात आले.

नित्यानंदांची मूर्ती

श्रीदत्तमंदिराला लागून जी लहान खोली आहे, तिथे आता नित्यानंदस्वामींच्या मूर्तीची स्थापना केली आहे. परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज त्याच खोलीमध्ये ठेवलेल्या पलंगावर झोपत असत.

त्याच बाजूच्या खोलीत परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी रामनवमीच्या दिवशीच श्रीराम-लक्ष्मण-सीता व हनुमान या मूर्तींची स्थापना केली.

फियाट गाडी

या श्रीदत्तमंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत उभी असलेली परमपूज्य श्रीसमर्थ राऊळ महाराजांनी गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर गाडीत पाणी म्हणून 'इंधन' टाकून चालवलेली इटालियन फियाट गाडी या पिंगुळी क्षेत्राचे आकर्षण वाढवते.

अतिरूद्र स्वाहाकार मंडप

या पवित्र भूमीची महती म्हणजे याच भूतलावर दोनदा अतिरूद्र स्वाहाकार संपन्न झाले पहिला परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांच्या १०१ व्या जयंतीनिमित्ताने ७ डिसेंबर २००५ ते १५ डिसेंबर २००५ ला आणि दुसरा २२ व्या पुण्यतिथीप्रित्यर्थ २३ जानेवारी २००७ ते३१ जानेवारी २००७ या दिवशी संपन्न झाला. हीच पवित्र जागा परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी स्वत:च्या समाधीस्थानासाठी निश्चित केली. या भव्य मंडपाचे नाव अतिरूद्र स्वाहाकार मंडप संबोधण्यात आले.
अतिरूद्र स्वाहाकाराच्यावेळी जशी यज्ञकुंडाची मांडणी होती, तशीच यज्ञकुंड समाधीस्थाना सभोवताली पुननिर्मित केलेली आहेत.

साटेली - भेडशी परमपूज्य श्रीसद्‌गुरू समर्थ राऊळमहाराज स्मारकमंदिर

३ नोव्हेंबर २०१६ रोजी परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांची मूर्ती, श्री गणपती आणि श्रीदेव शंकराची प्रतिष्ठापना समस्त राऊळमहाराज भक्तपरिवाराच्या उपस्थितीत साटेली-भेडशी येथील परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजस्मारकमंदिरात करण्यात आली.

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव